एक हजार रुपयांची बनावट नोट चलनात आणताना एका नायजेरीय विद्यार्थ्यांला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.
कार्ल जोसेफ आस्तुझ (वय २३, रा. माणिकचंद सोसायटी, लुल्लानगर, मूळ- नायजेरीयन) असे अटक केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो लष्कर भागातील अरिहंत कॉलेजमध्ये बीसीएच्या तिसऱ्या वर्षांला शिकत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ल याने शुक्रवारी रात्री साळुंके विहार रस्त्यावरील चाय हॉटेल येथे जेवन केले. जेवनाचे बील दोनशे चाळीस रुपये झाले होते. त्यानंतर त्याने हजार रुपयांची नोट हॉटेलमालकाला दिली. त्याने ही नोट शेजारच्या पेट्रोलपंपावर जाऊन तपासली असता ही नोट बनावट असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ कोंढवा पोलिसांना फोन करून बोलविले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी कार्ल याला ताब्यात घेऊन अटक केली. कार्ल हा पूर्वी राहत असलेल्या ठिकाणी त्याच्या मित्रांना अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे तेथील मालकाने त्यांना खोली सोडून जाण्यास सांगितले होते. आता त्याचे कोण साथीदार आहेत का? त्याने ही बनावट नोट कोठून आणली, त्याच्याकडे आणखी बनावट नोटा आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. थोपटे हे अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader