विनय सहस्रबुद्धे
भारतातील शिक्षण संस्थांत परदेशी विद्यार्थ्यांचा ओघ वाढावा यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) सिम्बॉयसिस आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने, पुण्यात ‘डेस्टिनेशन इंडिया’ ही राष्ट्रीय परिषद २८-२९ जानेवारीला होत आहे. या परिषदेच्या निमित्ताने आयसीसीआरच्या अध्यक्षांनी लिहिलेले टिपण..
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना भारतात शिकण्यासाठी यावे असे का वाटत नाही? आपली विद्यापीठे आणि त्यांची अध्यापन – अध्ययन आणि मूल्यांकन पद्धत वैश्विक दर्जाची विश्वसनीयता संपादन करण्यात अद्यापही खूप मागे आहे. वर्षांनुवर्षे भारतीय विद्यापीठे त्याच त्याच प्रशासकीय आणि अकादमिक समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेली आहेत. आय. आय. टी., आय. आय. एम. आणि काही नावाजलेली केंद्रीय विद्यापीठे आणि काही प्राच्य विद्या संस्था वगळता विदेशी विद्यार्थ्यांना आकर्षून घेण्यात सरकारी विद्यापीठे खूपच कमी पडत आहेत. एका आकडेवारीनुसार भारत हा उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षून घेण्याच्या क्षमतेच्या संदर्भात २६व्या, तर ज्या देशातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी देशाबाहेर जातात त्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय विद्यार्थ्यांची सहजपणे उपलब्ध असलेली मोठी संख्या आणि परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षून घेण्यासाठी जे करायला हवे त्याबाबतची उदासीनता, आळस वा संसाधनांचा अभाव; इ. अनेक घटकांमुळे भारतीय सरकारी विद्यापीठे या क्षेत्रात पीछाडीवरच राहिलेली आढळतात.
परदेशातून भारतात शिकण्यासाठी विद्यार्थ्यांचे येणे विविध कारणांनी खूप महत्त्वाचे आहे. सध्याचे युग ‘सॉफ्ट पॉवर’चे म्हणजे ‘सौम्य संपदेचे’ आहे, आणि ज्या देशात विद्यार्थी शिकायला जातात. त्या देशांच्या सौम्य संपदेत त्यामुळे मोलाची भर पडते. सौम्य संपदा संवर्धनातील विदेशी विद्यार्थ्यांचे महत्त्व लक्षात घेऊनच ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद’ जवळपास ४००० विदेशी विद्यार्थ्यांना भारतात उच्च शिक्षणासाठी येण्याकरिता शिष्यवृत्त्या देत असते. आयसीसीआरच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन भारतात शिकून आपल्या मायदेशात कर्तृत्व गाजविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. भारतीय उच्च शिक्षण संस्थांमधला परदेशी विद्यार्थ्यांचा ओघ निरंतर वाढता राहावा यासाठी लक्ष्य समोर ठेवून करावयाच्या सामूहिक आणि समन्वित प्रयत्नांची एक कृती – योजना आखण्याची गरज आहे. त्याच हेतूने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सिम्बॉयसिस विद्यापीठ यांनी संयुक्तरीत्या ‘डेस्टिनेशन इंडिया’ या नावाने एक राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. २८-२९ जानेवारीला पुण्यात संपन्न होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ हे करणार आहेत.
मानव संसाधन विकास, आयुष आणि गृहमंत्रालय, शिवाय विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय विश्वविद्यालय संघटना, सरकारी आणि काही खासगी विद्यापीठांचे कुलगुरू, परदेशी विद्यार्थ्यांच्या संघटना, काही आजी, माजी राजदूत आणि शिक्षण, उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक मातब्बर मंडळी या परिषदेत सहभागी होत आहेत. इतक्या व्यापक स्वरूपात सर्व संबंधित घटकांना एकाच व्यासपीठावर आणून समान उद्दिष्टपूर्तीसाठी विचार मंथन घडवून आणणारी अशी राष्ट्रीय परिषद देशात प्रथमच आयोजित होत आहे. भारतीय विद्यापीठांनी ‘विदेशी विद्यार्थीस्नेही’ होण्याच्या दृष्टीने जे करायला हवे त्याची सूची खूप मोठी आहे आणि प्रश्नही गुंतागुंतीचे आहेत. भारतीय वेद – विद्या, उपनिषद, महाकाव्ये अथवा भारतीय संगीत, नृत्य किंवा योग आणि प्राणायाम; फार काय भारतीय पाककलेचे प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढतेच आहे. या मंडळींची प्रशिक्षणार्थी म्हणून वेगळी नोंद होत नसल्याने भारतात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचा विचार करताना हा घटक सामान्यत: दुर्लक्षिला जातो. कृती योजना तयार करताना या घटकाचा विचारही अपरिहार्य आहे.
पुण्याच्या सिम्बॉयसिसचे डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद घडून येत आहे. पुणे, बंगळूरु, हैदराबाद, चंडीगड या काही शहरांचे महापौर, पोलीस आयुक्त परिषदेत सहभागी होत आहेत. या व्यापक आणि सर्वंकष विचार मंथनातून एक नवनीत निर्माण होईल आणि ज्ञानकेंद्री विश्वव्यवस्थेत भारताचे स्थान मजबूत होण्यासाठी कृती योजना साकारेल, असा विश्वास वाटतो.
vinay57@gmail.com