पुणे : जी – २० परिषदेसाठी परदेशी पाहुणे पुण्यात येण्यास शनिवारपासून सुरूवात झाली. पुण्यात १६ आणि १७ जानेवारी रोजी या परिषदेच्या बैठका होणार आहेत. त्यासाठी विविध देशांच्या प्रतिनिधींचे शनिवारी लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यामध्ये रशिया, ओमान आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन ॲण्ड डेव्हलपमेंटच्या सदस्यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ओमानच्या प्रॉडक्शन ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंटचे संचालक सलीम अहमद बाओमर आणि सलीम एम. अलबत्ताशी यांचे सायंकाळी पुणेरी पगडी आणि शाल घालून स्वागत केले.
हेही वाचा – पुण्यातून हुबळीसाठी थेट विमान, इंडिगो कंपनीची ५ फेब्रुवारीपासून सुविधा
सकाळी रशियाचे प्रतिनिधी वदीम आन्द्रेवीच टारकीन, दुपारच्या सत्रात रशियाचे दिमित्री अटापीन आणि ओईसीडीचे कोर्टनी व्हीलर यांचे पुणेरी पगडी घालून आणि शाल घालून ढोल ताशाच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते.
हेही वाचा – पुणे : नवउद्यमींना सर्वतोपरी मदत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा वादक, तुतारी वादक पथक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.