पुणे : विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद करण्यासाठी पिरंगुटमध्ये हत्तीवरून काढलेली मिरवणूक आणि पेढे वाटप मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगली येथील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल केला आहे.
निवडणुकीच्या तीन महिन्यांनंतर शंकर मांडेकर यांचा विजय साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री पिरंगुट येथे ‘हत्तीवरून मिरवणूक आणि १२५ किलो पेढे वाटप’ असा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी खास सांगलीवरून श्री गणपती पंचायतन देवस्थानचा हत्ती आणण्यात आला होता. मांडेकर यांची हत्तीवर बसून मिरवणूक काढण्यात आली. या संदर्भातील छायाचित्रे आणि चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाल्याचे निदर्शास आल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांनी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागातून याप्रकरणाची अधिक माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली.
वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हत्तीला विशेष संरक्षण असल्याने त्याला मिरवणुकीत सहभागी करून घेण्यावर अनेक निर्बंध आहेत. तरीही पिरंगुटमध्ये हत्तीला गर्दीमध्ये फिरविण्यासाठी आणण्यात आले होते. या मिरणुकीचे संयोजक राहुल बलकवडे यांनी सांगलीवरून श्री गणपती पंचायतन देवस्थानातून हत्ती आणल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले.
‘कोल्हापूर परिमंडळाच्या अतिरिक्त मुख्य वन्यजीव संरक्षकाकडून संयोजकांना हत्तीच्या केवळ वाहतुकीसाठी परवानगी दिली होती. गर्दी, गोंगाट असलेल्या ठिकाणी हत्तीला नेण्यात येऊ नये, त्याचा वावर असलेल्या भागात फटाके वाजवू नयेत, असे पत्रामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते. तरीही संयोजकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून हत्तीची मिरवणूक काढली. त्यामुळे संयोजक आणि संस्थेवर वनाधिकाऱ्यांनी कारवाई केली, असे परांजपे यांनी सांगितले. या प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी सांगली आणि पुण्यातील वन विभागाचे अधिकाऱ्यांचे पथक तासगाव येथे जाणार आहे. हत्ती सध्या देवस्थानकडे असून त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती पौड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली.