वनातील पशुपक्ष्यांसाठी तयार केलेल्या मानवनिर्मित पाणवठय़ांना पुरवाव्या लागणाऱ्या पाण्यासाठी टँकरऐवजी सौर पंप बसवलेल्या कूपनलिकांच्या साहाय्याने पाणी खेचून घेण्याचा मार्ग वन विभागाने अवलंबला आहे. पावसाचे पाणी न पुरल्यामुळे फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागणाऱ्या सुपे, नानज आणि रेहेकुरी अभयारण्यात ९ ठिकाणी हा उपाय योजण्यात आला आहे.
सुपे अभयारण्यात एक लहान तलाव असल्यामुळे तिथे बाहेरून टँकर न नेता तलावातील पाणीच वनातील पाणवठय़ांमध्ये पोहोचवले जाते. नानजमध्ये २ पाणवठय़ांवर पाणी द्यावे लागत असून तिथे तसेच रेहेकुरीत आठवडय़ातून साधारणत: एकदा टँकरने पाणी पुरवावे लागते. बेसाल्ट खडक असलेल्या भागात पाऊस पडला तरी पाणी जमिनीत झिरपल्यामुळे ते फारसे टिकत नाही. त्यामुळे या भागात फेब्रुवारीपासूनच नाले कोरडे पडायला लागून पाणीटंचाई जाणवू लागते आणि एप्रिलमध्ये ही समस्या आणखीनच वाढते. टँकर पोहोचण्यास उशीर झाला तर त्यात भर पडण्याची शक्यता असते.
गेल्या सहा महिन्यांत वन विभागाने सुप्यात तीन ठिकाणी, नानजमध्ये चार ठिकाणी आणि रेहेकुरीत दोन ठिकाणी सौर पंप बसवलेल्या कूपनलिकांमधून पाणी घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये म्हणाले, ‘सौर पंप बसवलेल्या बोअरवेलमधून पाण्याचा वेगळा उपसा करावा लागत नाही. चोवीस तास हळहळू पाणी खेचले जाऊन ते नळीवाटे वनातील पाणवठय़ात सोडले जाते. यात पाणवठय़ावर एकाच वेळी खूप पाणी सोडले जात नसल्याने पाणी वाया जात नाही, परंतु टंचाईच्या काळात वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी राहते.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा