आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यभरातील व्यक्ती व संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन महासंघाची स्थापना रविवारी भोसरीत करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, राज्यमंत्री सुरेश धस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, तिघांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने संयोजकांचा चांगलाच हिरमोड झाला. या उपक्रमाचे कौतुक करतानाच आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही उपस्थित मान्यवरांनी दिल्याने त्यांना प्रोत्साहनही मिळाले.
भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृहात महापौर मोहिनी लांडे व आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते संस्थेची स्थापना झाली. परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी जितेंद्र पाटील, संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर माडवकर, ‘यशदा’चे कर्नल सुपणेकर, अशोक जाधव, सहायक आयुक्त सुभाष माछरे, आशा दुर्गुडे, किरण गावडे, समन्वयक ओमप्रकाश बहिवाल, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके आदी व्यासपीठावर होते.
महापौर लांडे म्हणाल्या,की आपत्ती सांगून येत नसल्याने त्यापूर्वीच नियोजनाची सक्षम यंत्रणा हवी. अपघाताच्या ठिकाणी नागरिक थांबत नाहीत. कारण, पोलीस व न्यायालयाच्या कटकटी त्यांना नको असतात. मात्र, तसे न करता नागरिकांनी निर्भयपणे कर्तव्ये पार पाडावीत. आयुक्त जाधव म्हणाले,की राज्यातील अन्य जिल्ह्य़ांना या संघात सहभागी करून घ्यावे आणि असे काम करणाऱ्या आणखी संस्था उभ्या कराव्यात. जितेंद्र पाटील म्हणाले,की अपघातांचे प्रमाण वाढले. वर्षांकाठी देशात एक लाख २० हजार जणांचा मृत्यू अपघातात होतो. हेच प्रमाण दरदिवशी ३५० पर्यंत आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पूर्वतयारी असली पाहिजे. तसेच मानवनिर्मित आपत्ती टाळण्यासाठी आवश्यक विचार झाला पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयुक्त वाहनांची गरज अधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा