पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडच्या भोसरी विधानसभेत राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे माजी बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे हे काही वेळातच मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधणार आहेत. रवी लांडगे हे त्यांच्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्यासह इतर पदाधिकारी आहेत.
रवी लांडगे हे भाजपचे बिनविरोध निवडून आलेले माजी नगरसेवक आहेत. भाजपने वेळोवेळी डावलल्याने शिवसेना ठाकरे गटात जात असल्याचं मत व्यक्त केलं आहे. विद्यमान आमदार महेश लांडगे यांना कंटाळून मी हा निर्णय घेत असल्याचं रवी लांडगे यांनी अधोरेखित केलं. आगामी काळात भोसरी विधानसभेत लढण्यास मी इच्छुक आहे. पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवेल अशी भूमिका देखील रवी लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा-धरणे काठोकाठ, मात्र टँकरवर मदार; पश्चिम महाराष्ट्रातील दीड लाखांवर नागरिकांची अद्याप परवड
शिवसेना ठाकरे गटात इच्छुकांमुळे पेच निर्माण होणार
भोसरी विधानसभेमध्ये रवी लांडगे हे शिवसेना ठाकरे गटात आल्यानंतर महाविकास आघाडीत पेच निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटात देखील इच्छुकांची डोकेदुखी वाढू शकते. आधीच महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे हे देखील भोसरी विधानसभेतून इच्छुक आहेत. त्यांनी देखील तयारी सुरू केलेली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटातून सुलभा उबाळे यांच्या पाठोपाठ रवी लांडगे यांनी देखील भोसरी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. असं म्हणावं लागेल. हे सर्व पाहता शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीत भोसरी विधानसभेवरून बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.