भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष बदलीच्या मागणीवरून भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी शहराध्यक्ष तातडीने बदलावा, अशी थेट मागणी समाजमाध्यमातून केली आहे. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना वेळीच बदललेली नाही तर आगामी महापालिका निवडणूक जिंकणे अवघड आहे, असे केसकर यांनी म्हटले आहे. यानिमित्ताने शहराध्यक्ष बदलाची मागणीलाही पक्षातून जोर मिळण्याची शक्यता असून पक्ष नेतृत्व यासंदर्भात काय निर्णय घेणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>> पुणे: ‘पुरुषोत्तम’च्या महाअंतिम फेरीला सुरुवात
वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. गेल्या वर्षीपासून भाजप शहराध्यक्षपद बदलण्यात यावे, अशी मागणी सातत्याने काही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. त्यातच माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी समाजमाध्यमातून थेट शहराध्यक्ष पदाची जाहीर मागणी केल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
‘भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात बदल करणे आता आवश्यक झाले आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे किंवा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना शहराध्यक्ष केले पाहिजे. नेतृत्वात बदल झाला नाही तर महापालिका निवडणुकीत भाजपचे अवघड आहे. जगदीश मुळीक यांना खासदारकी द्या आणि त्यांचे पुनर्वसन करा. पण शहराध्यक्षपद त्वरीत बदला. सिद्धार्थ शिरोळे हा योग्य उमेदवार आहे,’ असे केसकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> पुणे : भेंडी, काकडी, दोडका, तोतापुरी कैरीच्या दरात वाढ
भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गटबाजी पुढे आली आहे. यापूर्वी शहर भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे समर्थक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक असे दोन गट होते. शहराध्यक्षपदावरून या दोन्ही गटात सातत्याने शीतयुद्ध पहावायस मिळाले होते. त्यानंतरच्या मधल्या काळात शहराचे नेतृत्व कोणी करायचे, यावरूनही दोन मोठ्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाला होता. खासदार गिरीश बापट आणि विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातही यावरून शीतयुद्ध सुरू झाले होते. सध्या शहराचे नेतृत्व चंद्रकांत पाटील यांच्याकडे आले आहे. मात्र पक्षात अंतर्गत गटबाजी कायम असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. शहराध्यक्ष बदलाची मागणी थेट झाल्याने पक्ष नेतृत्व यासंदर्भात काय निर्णय घेणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.