पिंपरी: विनापरवाना गैरहजर आणि उद्धट वर्तनाबाबत कर्मचाऱ्याला नोटीस दिल्याने भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण केली. ही घटना भोसरीतील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात घडली.
याप्रकरणी राजेश नंदलाल भाट (वय ५४, रा. थेरगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर मुरलीधर सोनवणे (वय ३२, रा. बोपखेल गावठाण) आणि संतोष लांडगे (वय ४५) यांच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी भाट हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शंकर सोनवणे यास विनापरवाना गैरहजर आणि उद्धट वर्तनाबाबत नोटीस बजावली होती. त्या कारणावरून त्याने इतर साथीदारांना घेऊन येत भाट यांना शिवीगाळ केली. मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आले. अनोळखी व्यक्तीने भाट यांच्या कानशिलात लगावली.
भाट यांना मारहाण करत त्यांच्या कार्यालयात ओढून नेले. शंकर सोनवणे यांनी तुझ्या नावाने आत्महत्या करून तुझी नोकरी घालवतो अशी धमकी दिली. फिर्यादी शासकीय काम करत असताना आरोपींनी त्यांना अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संतोष लांडगे हे भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे यांचे पती आहेत.