पिंपरी : दुसर्याच्या जागेत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण करून पत्र्याचे कंपाऊंड पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह चार जणांवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रावेत येथे घडला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचा मुलगा कुणाल याच्यासह महेंद्र जगन्नाथ गरड, मॅनेजर अनिकेत मनोज चव्हाण (वय २९, रा. नवी सांगवी), सुपरवायझर विशाल माणिक गायकवाड (वय २७, रा. म्हातोबानगर, वाकड)
अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कांतीलाल मोतिलाल कर्नावट (वय ६७, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. रावेत ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी याबाबत माहिती दिली. फिर्यादी कर्नावट यांची रावेत येथे २० गुंठे जागा आहे. या जागेत त्यांनी १६ जून रोजी पत्र्याचे कंपाऊंड केले होते. १७ जून रोजी सकाळी आरोपी अनिकेत व विशाल हे कर्नावट यांच्या परवानगीविना जेसीबी घेऊन त्यांच्या जागेत घुसले आणि पत्र्याचे कंपाऊंड पाडले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास जेसीबी
घेऊन पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. कर्नावट यांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता ही जागा कुणाल भोंडवे व महेंद्र गरड यांची आहे, असे सांगत आम्ही आमच्या जागेत काम करत आहोत. हे काम चालूच ठेवणार, अशी धमकी दिली. फौजदार पन्हाळे तपास करत आहेत.