पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांनी वातावरण निर्मिती सुरू केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे हे ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त मतदारसंघात जोरदार फलकबाजी केली आहे. या फलकांवर लोकसभेच्या छायाचित्रासह वाघेरे यांची छबी झळकत आहे. मात्र, कोणत्याही पक्षाच्या चिन्हाचा फलकावर वापर टाळला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीची फेब्रुवारीअखेर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मावळमध्ये पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगडमधील पनवेल, कर्जत, उरण या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मागील तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये लढत झाली. तिन्ही वेळेस शिवसेनेने मैदान मारले. आता परिस्थिती बदलली असून शिवसेना, राष्ट्रवादीत उभी फूट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गट भाजपासोबत आहेत. हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून लढणार आहेत.
मावळ मतदारसंघ ठाकरे यांच्या गटाला सुटण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने ठाकरे गटाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. पिंपरी महापालिकेतील भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे हे ठाकरे गटाकडून लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी पक्ष नेतृत्वासोबत चर्चा केली आहे. वाघेरे यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात जोरदार फलकबाजी केली आहे. ‘आता प्रत्येक ध्येय विकासाच गाठायचे, प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचे’ असा मजकूर या फलकांवर आहे. त्यामुळे वाघेरे हे ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – जेजुरीत सोमवारी सोमवती अमावस्येचा सोहळा! सकाळी सात वाजता पालखी करणार प्रस्थान
महायुतीकडून शिंदे यांच्या शिवसेनेला जागा सुटण्याची आणि खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मावळात दोन्ही शिवसेनेतच सामना होऊ शकतो. तर, मावळात ताकद असतानाही अजित पवार गटाला महायुतीत माघार घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.