लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : गॅस एजन्सीत गुंतवणुकीच्या आमिषाने पाच कोटी ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यासह मुलगा मयुरेश याला जामीन मंजूर केला.
गॅस एजन्सीत गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी आणि त्यांचा मुलगा मयुरेश यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याबाबत ठेकेदार मंगेश खरे यांनी फिर्याद दिली होती. जोशी यांनी याप्रकरणात शिवाजीनगर न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. शिवाजीनगर न्यायालयाने जोशी यांच्यासह मुलाचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर जोशी यांनी त्यांचे वकील ॲड. ऋषीकेश करवंदे आणि समीर वैद्य यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज सादर केला होता. न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर जोशी यांच्यासह मुलाची जामीनावर मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. जोशी यांच्याविरुद्ध नऊ जणांनी तक्रारी दिल्या होत्या. जोशी यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या. करोना संसर्ग काळात गॅस एजन्सीचा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला होता. त्यामुळे जोशी यांनी काहीजणांकडून हातउसने पैसे घेतले होते. त्यामध्ये काही सावकारांचा समावेश होता. काही सावकारांनी गॅस एजन्सी ताब्यात घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा वापर करुन गुन्हे दाखल केल्याची माहिती जोशी यांनी दिली.