पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील सूत्रधार प्रसाद बेल्हेकर याला गुन्हे शाखेने अटक केली. बेल्हेकरला न्यायालयाने २४ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली असून, दाेन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले.
आंदेकर यांचा एक सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. आंदेकर यांचा खून कौटुंबिक वाद, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाला. आंदेकर यांची बहीण संजीवनी, मेहुणे प्रकाश, जयंत, गणेश, काेमकर, सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली. आंदेकर यांचा खून झाल्यानंतर नाना पेठेतील समाधान चौकात राहणारा प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (वय ३३) पसार झाला होता. बेल्हेकर याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्नासह चार गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. तो नाना पेठेतील सूरज ठोंबरे टोळीतील आहे. ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड मित्र आहेत. वर्षभरापूर्वी झाालेल्या निखिल आखाडेच्या खुनाचा बदला घेण्याची संधी गायकवाड शोधत होता. आरोपी कोमकर, गायकवाड आणि बेल्हेकर यांनी आंदेकरांचा खून करण्यासाठी कट रचल्याची माहिती तपासात उघड झाली.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कोमकर आणि गायकवाड यांची बैठक झाली. बेल्हेकर याने गायकवाड आणि कोमकर यांची बैठक घडवून आणली होती. आरोपी गणेश कोमकर आणि बेल्हेकर समाज माध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात होते. याबाबतचे तांत्रिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. खूनाच्या कटात बेल्हेकरने महत्त्वाची भूमिका बजावली, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपींना जामीन मिळवून देण्याची जबाबदारी
आंदेकर यांचे मेहुणे गणेश याच्यावर खून प्रकरणातील आरोपींना जामीन मिळवून देणे, तसेच पैसे उभे करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कोमकर, बेल्हेकर, गायकवाड, दहिभाते यांनी आंदेकरांचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले.
हेही वाचा – पुणे : खरिपातील शेतीमालाचे दर गडगडले जाणून घ्या, हमीभाव किती, दर किती मिळतोय
तीन अल्पवयीनांपैकी एक सज्ञान
आंदेकर खून प्रकरणात सुरुवातीला तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी एक सज्ञान असल्याचे तपासात उघडकीस आले. श्री तात्यासाहेब गायकवाड (वय १८) असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणात प्रसाद बेल्हेकर याने महत्त्वाची भूमिका बजावली. तो खून प्रकरणातील सूत्रधार आहे. याबाबतचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. – गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा