पाषाण येथे राजकीय वर्चस्वातून चुलत भावाचा गोळ्या घालून खून केल्याच्या आरोपावरून माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांच्या दोन मुलांना रविवारी चतु:श्रुंगी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात शनिवारी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
चेतन तानाजी निम्हण (वय २७) आणि तुषार तानाजी निम्हण (वय ३३, दोघे रा. ताई आर्केड, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शनिवारी अटक केलेल्या मुन्ना उर्फ दिग्विजय संभाजी निम्हण (वय २२, रा. पाषाण) याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या घटनेत प्रतीक रामभाऊ निम्हण (वय १९, रा. निम्हण मळा, पाषाण) या तरुणाचा खून झाला आहे. या प्रकरणी प्रतीकचा मित्र कीर्ती रामदास काळे (वय २९, रा. काळे इलाईट, पाषाण) याने फिर्याद दिली आहे. या गुन्ह्य़ात सागर निम्हण, राहुल गुंड, रवी शिर्के, अभिजित घाडगे व इतर चार ते पाचजण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक हा फिर्यादी काळे याच्या घराजवळ शुक्रवारी रात्री मित्रांसोबत गप्पा मारत असताना तुषार, चेतन व इतर मोटारसायकलवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी शिवीगाळ करत प्रतीकच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून घरात पळून गेलेल्या प्रतीकला त्याच्या पाठीमागे जाऊन त्याच्यावर चार गोळ्या झाडल्या. त्यात प्रतीकचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुन्नाला शनिवारीच अटक करण्यात आली होती, तर तुषार आणि चेतन यांना मिळालेल्या माहितीवरून रविवारी अटक करण्यात आली. या दोघांनी दोन पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे मागविली होती. त्यातील दोन सरावासाठी, तर गुन्ह्य़ात आठ काडतुसे वापरल्याचे चौकशीत समोर आले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत तानाजी निम्हण इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत त्यांचा उमेदवार उभा केला होता, पण तो उमेदवार पराभूत झाला. या निवडणुकीत रामभाऊ निम्हण यांच्या पुतण्याच्या पत्नीला तिकीट मिळाले होते. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या. तेव्हापासून तानाजी आणि रामभाऊ निम्हण यांच्यातील वादाला सुरुवात झाली. जुलै २०१२ मध्येही या दोन गटात मारामारी झाली होती. त्यावेळी रामभाऊ निम्हण यांच्या दोन कार्यकर्त्यांना आरोपींनी जबर मारहाण झाली होती, असे उमप यांनी सांगितले.
पाषाण येथील खून प्रकरणात माजी नगरसेवकाच्या मुलांना अटक
पाषाण येथे राजकीय वर्चस्वातून चुलत भावाचा गोळ्या घालून खून केल्याच्या आरोपावरून माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांच्या दोन मुलांना रविवारी चतु:श्रुंगी पोलिसांनी अटक केली.
आणखी वाचा
First published on: 15-04-2013 at 02:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former corporators sons arrested in nimhan murder case at pashan