पिंपरी : महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी सातत्याने केली जाते. भारतरत्न अनेक आहेत. परंतु, महात्मा पदवी मिळालेले कमी आहेत. त्यामुळे भारतरत्न मोठे की महात्मा, असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. तसेच, हे माझे व्यक्तिगत मत असून, महात्मा फुले यांना भारतरत्न सन्मान देण्याच्या मागणीला माझा विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, सचिन अहिर या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा…आळंदी: देशात अराजकता निर्माण करण्यासाठी देश विदेशातील शक्तींनी षड्यंत्र केलं, देवेंद्र फडणवीस
े
भुजबळ म्हणाले, ‘महात्मा जोतिराव फुले यांना भारतरत्न सन्मान देण्याची मागणी केली जाते. याबाबत मी अनेक विचारवंतांशी चर्चा केली. भारतरत्न दिल्यास भारतरत्न महात्मा जोतिराव फुले असा नामोल्लेख करायचा का? महात्मा कमी आहेत. भारतरत्न अनेक आहेत. त्यामुळे जनतेने बहाल केलेली जोतिराव फुले यांची महात्मा ही मोठी पदवी आहे. हे माझे मत आहे. भारतरत्न सन्मानाचा किंवा हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींचा मला अवमान करायचा नाही.’
‘महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजात क्रांती घडविली. महात्मा फुले यांचा लढा अंधश्रद्धा, ब्राह्मण्यवादाविरोधात होता. शेती, बेरोजगारीवर त्यांनी लिहिले. त्यांच्यावरही अन्याय झाला. त्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठविला. मंडल आयोगाची अंमलबजावणी शरद पवार मुख्यमंत्री असताना झाली. फुले-शाहू-आंबेडकर ही आमची दैवते आहेत. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी मी आणि शरद पवार कितीही वेळा एकत्र येऊ शकतो. राजकीय चिंता करू नये,’ असेही ते म्हणाले.
हेही वाचा…पुणे : व्यायामशाळेत अल्पवयीनावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्ष सक्तमजुरी
‘कांद्यावरील कर हटवावा’
‘जगात चाकण भागातून कांदा निर्यात केला जातो. परंतु, केंद्र सरकारने निर्यातीवर कर लावला. त्याची झळ कांदाउत्पादकांना सोसावी लागते. शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी राज्यकर्त्यांनी महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शेतकरीहिताचे निर्णय, कायदे करावेत. महात्मा फुले यांनी विज्ञानाचा विचार रुजविला. संकरित धान्य, बियाणे वापरण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्राबरोबरच उत्तर भारतातही महात्मा फुले यांचे नाव घराघरांत पोहोचले आहे. त्यांच्या कार्याची नोंद देशपातळीवर घेतली आहे,’ असे शरद पवार म्हणाले.