बुलेट ट्रेन असती तर या सरकारने शेतकऱ्यांना थेट परदेशात पोहचवले असते असे म्हणत आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारची खिल्ली उडवली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान अजित पवार बोलत होते. इतकेच नाही तर या सरकारने महिलांबाबत गलिच्छ भाषा वापरून त्यांची प्रतिष्ठा हिरावून घेण्याचा खटाटोप चालवला आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला. हे सरकार भुलथापा, फेकुगिरी करताना दिसते आहे. बुलेट ट्रेन येण्याआधीच सरकारवर सव्वा लाख कोटींचे कर्ज झाले आहे या बुलेट ट्रेनची गरज नाही असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतकरी त्यांच्या मागण्यांचा मोर्चा काढण्यासाठी दिल्लीत गेले होते. मोर्चा संपल्यावर शेतकरी कोल्हापूरला येण्यासाठी रेल्वेत बसले. मात्र शेतकऱ्यांना तीन तासांनी समजले की ते उलट दिशेने १८० किलोमीटर पुढे गेले आहेत. ती रेल्वे होती म्हणून ते देशातच राहिले बुलेट ट्रेन असती तर या सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना थेट परदेशात धाडले असते असा टोला अजित पवार यांनी लगावला. बुलेट ट्रेनने शेतकरी परदेशात गेले असते तर उतरणार कसे? तिथे उतरताना पासपोर्टही नाही आणि व्हिसाही नाही, काहीच नाही करणार काय? असा प्रश्न विचारताच कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी नाभिक समाजाबाबत काढलेले उद्गार चुकीचे आहेत. आधी वक्तव्य करायचे आणि मग दिलगिरी व्यक्त करायची हे उद्योग या सरकारने का चालवले आहेत? राज्याच्या प्रमुखाला नाभिक समाजाबाबत असे वक्तव्य करणे शोभते का? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former deputy cm ajit pawar criticized government on bullet train issue