पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या नियोजित राष्ट्रीय स्मारकाचे काम हेतुपुरस्सर रखडविण्यात येत असल्याचा आरोप माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांनी केला आहे. राज्य सरकारने संबंधित २५ एकर जागा स्मारकासाठी आरक्षित करून राष्ट्रीय स्मारकाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
येत्या एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या नियोजनासंर्दभातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे उपस्थित होते. डॉ. धेंडे म्हणाले,‘विजयस्तंभाच्या परिसरातील राष्ट्रीय स्मारकाची नियोजित जागा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत येते. स्मारकासाठी २५ एकर जागा अपेक्षित असून, प्रसासनाकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. अद्याप स्मारकाचे काम सुरु झालेले नाही.’
हेही वाचा…‘ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’वर महाराष्ट्राची आघाडी… क्रेडिट्स नोंदवण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पायाभूत सुविधांसाठी कुठलीही अडचण नसताना अद्याप या ठिकाणी कुठलीच सुविधा नसून अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना अडचणींचा सामना करावा लागतो. या पायाभूत सुविधांसाठी आणि राष्ट्रीय स्मारकासाठी २५ एकर जागा अपेक्षित आहे. या जागेत काही खासगी जागा येत असून, राज्य शासनाने तातडीने आरक्षण टाकून संबंधितांना मोबदला देऊन जागेचे भूसंपादन करावे आणि राष्ट्रीय स्मारकाचे काम सुरु करावे, अशी मागणी डाॅ. धेंडे यांनी केली.
हेही वाचा…व्यावसायिक अभ्यासक्रमांत मुलींच्या प्रवेशसंख्येत वाढ… मोफत शिक्षण योजनेचा परिणाम?
अभिवादन सोहळ्यासाठी नियोजन पूर्ण
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळा ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे २५ लाख अनुयायी सहभागी होणार असून, त्या दृष्टीने पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि समन्वय समितीकडून सुविधांबाबत नियोजन करण्यात आले आहे, असे डंबाळे यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी अभिवादन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे, भीम आर्मी पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद तसेच अनेक पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे, असे डंबाळे यांनी सांगितले.