लोकसता प्रतिनिधी
पुणे : शिक्षण संस्थाचालकाना २५ लाख रुपयांची खंडणी मागणार्या संस्थेतील माजी कर्मचाऱ्याला सिंहगड रस्ता पोलिसानी अटक केली. सुदर्शन कांबळे (रा. धायरी फाटा) असे या माजी कर्मचार्याचे नाव आहे.
सुदर्शन कांबळे हा या शिक्षण संस्थेत सीसीटीव्ही कॅमेर्याची तांत्रिक जबाबदारी सांभळत होता. करोना काळात त्याने येथील काम सोडले होते़. याबाबत शिक्षण संस्थाचालकाने सिंहगड रास्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुदर्शन कांबळे हा ६ मार्च रोजी शिक्षण संस्थेच्या आवारात आला. त्याने शिक्षण संस्थाचालकांच्या मोबाईलवर संदेश पाठविला. तुमचा मुलगा आणि एक महिला कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आहेत. आक्षेपार्ह अवस्थेतील चित्रफित माझ्याकडे आहेत. चित्रफीत प्रसारित करून संस्थेची बदनामीकरेल, तसेच संबंधित वृत्त प्रसारित न करण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने वारंवार संदेश पाठवूनखंडणी मागितली. संस्थाचालकांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेतली.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे यांनी सांगितले सुदर्शन कांबळे हा संस्थेमध्ये टेक्नीशियन म्हणून कामाला होता. कारोना काळात त्याने नोकरी सोडवली होती. आपल्याकडे व्हिडिओ असल्याचे सांगितले तर ते पैसे देतील, असे वाटल्याने त्याने खंडणी मागितली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण तपास करीत आहेत.