माजी कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
सिरम इन्स्टिटय़ूटमध्ये विकसित केलेल्या लसीचे संशोधन व स्वामित्व हक्क घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिरमच्या संशोधन विभागाचे माजी सहाय्यक व्यवस्थापक व गुणवत्ता नियंत्रण विभागातील एका डॉक्टरविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. मनोजकुमार चिकारा आणि डॉ. राकेश राणा अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. सिरम इन्स्टिटय़ूटचे मानव संसाधन विकास विभागातील अधिकारी रमेश पाटील यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. चिकारा आणि डॉ. राणा हे सिरम इन्स्टिटय़ूटमधील गुणवत्ता नियंत्रण विभागात कार्यरत होते. त्याअंतर्गत सन २०१० ते २०१४ याकालावधीत संशोधन करून मेनअ‍ॅफ्री व्हॅक नावाची लस विकसित करण्यात आली होती. सन २०११ मध्ये डॉ. राणा यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सन २०१३ मध्ये डॉ. चिकारा यांनी राजीनामा दिला. डॉ. चिकारा आणि डॉ. राणा हे दिल्लीतील एमएसडी वेलकम ट्रस्ट हिलमन लॅबोरेटरीज या कंपनीत रुजू झाले. दोघांनी गोपनीय माहितीचा गैरवापर केला. दरम्यान सिरमने विकसित केलेल्या लसीचे स्वामित्व हक्क घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. तेव्हा याच प्रकारच्या लसीचे स्वामित्व हक्क घेण्याचा अर्ज भरण्यात आल्याचे सिरमच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.
सिरमच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली तेव्हा त्या अर्जात डॉ. चिकारा आणि डॉ. राणा यांचे संशोधक म्हणून नाव असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांनी विश्वासघात करून फसवणूक केली, अशी तक्रार सिरममधील अधिकारी रमेश पाटील यांनी दिली. या दोघांविरुद्ध माहिती- तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अंजुम बागवान तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा