पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रात्री मुंबईत भेट घेतली. कलाटे हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कलाटे यांचा शिंदे गटातील प्रवेश उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
कलाटे यांच्यासोबत माजी नगरसेवक नवनाथ जगताप हे उपस्थित होते. काही माजी नगरसेवकदेखील कलाटे यांच्यासोबत शिवसेनेत जाणार आहेत. त्यात माजी नगरसेवक जगताप, संपत पवार, माजी नगरसेविका अश्विनी वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे कळते.
हेही वाचा – पिंपरी : महापालिकेचा फतवा… मालमत्ता कर भरा, नाहीतर जप्ती!
याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, कलाटे यांनी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत चर्चा करून दिशा ठरविणार आहे. त्यांच्यासारखा चांगला सहकारी भविष्यात मिळणार आहे. याचा मनापासून आनंद आहे. कलाटे यांचा करिष्मा आहे. त्यांच्या समवेत येणारे सहकारी, विकासाच्या कामाला गती दिली जाईल.
कोण आहेत राहुल कलाटे?
राहुल कलाटे २००२ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत पराभूत झाले. २०१४ च्या विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढली, त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. २०१७ मध्ये पहिल्यांदा शिवसेनकडून नगरसेवक झाले. त्यांनी वाकड भागाचे प्रतिनिधित्व पालिकेत केले. ते शिवसेनेचे गटनेते, तसेच शहरप्रमुखदेखील होते. त्यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित आघाडीच्या पाठिंब्यावर चिंचवडमधून विधानसभा निवडणूक लढविली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडकरांच्या चिंतेत भर; पवना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत जलसाठा…
भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना कडवी झुंज दिली. दिवंगत आमदार जगतापांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीवेळी महाविकास आघाडीतून बंडखोरी करून निवडणूक लढविली. मात्र, यावेळी कलाटे यांची अनामत रक्कम जप्त झाली. शिंदे-फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच कलाटे यांनी बंडखोरी केल्याचे सांगितले गेले. अखेर कलाटे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली आहे.