Tanaji Sawant Son Missing : शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे विमानतळावरून ऋषीराज सावंत दुपारपासून बेपत्ता झाला आहे. दरम्यान, याबाबतची माहिती पोलिसांना समजताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे पोलिसांनी काही माहिती सांगितली?

“पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला ४ वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांना कोणीतरी घेऊन गेलं आहे. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला आहे. ऋषीराज सावंतबाबत सर्व माहिती घेण्यात येत असून ते पुण्यातून विमानाने गेले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. ऋषीराज सावंत कोणत्या विमानाने आणि कोठे गेलेत? याची माहिती पोलीस घेत आहेत. याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात एक अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने क्राईम ब्रांचकडे तपास सोपवण्यात आला असून क्राईम ब्रांच तपास करत आहे”, अशी माहिती पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

तानाजी सावंत काय म्हणाले?

पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदे घेतली तेव्हा तानाजी सावंत हे देखील उपस्थित होते. यावेळी तानाजी सावंत हे म्हणाले की, “ऋषीराज सावंत विमानाने गेल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, आमचं बोलणं झालेलं नाही. ड्रायव्हर मुलाला सोडवायला गेला होता, त्याने आम्हाला माहिती दिली की मी मुलाला पुणे विमानतळावर सोडून आलो. त्यामुळे आम्हाला कळलं की विमानतळावर आला. अजून त्याच्याबरोबर त्याचे दोन मित्रही आहेत. पण ते नेमकं कुठे गेलेत? याबाबत आम्हाला काही माहिती नाही. मुलाबरोबर माझं बोलण होत असतं तसं आज बोलणं झालेलं नाही. त्यामुळे आम्हाला चिंता लागली आहे”, अशी माहिती तानाजी सावंत यांनी सांगितली.

“मुलगा ऋषीराज सावंत हा बेपत्ता किंवा अपहरण असं अद्याप काहीही नाही. कारण त्याचे दोन मित्रच आहेत. त्याच्यामध्ये दुसरं नवीन कोणीही नाही. पण त्याने त्याची गाडी वापरली नाही. त्याने दुसऱ्यांची गाडी वापरली त्यामुळे आम्हाला चिंता लागली. पण आमचा कायम संपर्क असतो. पण आज आमचं बोलणं झालं नाही. त्यात आज त्याचा फोन आला नाही. तसेच अचानक तो पुणे विमानतळावर कशाला गेला? त्यामुळे आम्ही पोलिसांकडे आलो. येथे आल्यानंतर माहिती समजली की ते एका खासगी विमानाने गेले आहेत. त्यामुळे आता ते कुठे जातात? आम्ही माहिती घेत आहोत”, अशी माहिती तानाजी सावंत यांनी सांगितली आहे.