पुणे : चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोर पानसिंह तोमर आणि संसदेवर झालेल्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार दहशतवादी गाजीबाबा यांना ठार करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय रमण (वय ७२) यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. मागील काही महिन्यांपासून कर्करोगासोबत सुरू असलेली त्यांची लढाई अपयशी ठरली.
हेही वाचा >>> कमी पटसंख्येच्या शाळांवर घाला; राज्यभरात समूह शाळांची निर्मिती
रमण हे मध्य प्रदेश केडरचे १९७५ च्या तुकडीचे अधिकारी होते. त्यांना कर्करोग झाल्याचे निदान फेब्रुवारीमध्ये झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांच्यात सुधारणा झाल्याचे लक्षण दिसून आले. मात्र, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रमण यांना १८ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आले होते. मात्र त्यांचे अचानक निधन झाले.
हेही वाचा >>> अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी ६८ अभ्यासक्रम; बार्टी, एनआयईएलआयटीतर्फे उपक्रम
चंबळच्या खोऱ्यामध्ये वास्तव्यास असलेल्या दरोडेखोरांमध्ये विजय रमण यांची दहशत होती. दहशतवादी आणि नक्षलविरोधी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतलेल्या रमण यांनी मध्य प्रदेश पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि रेल्वे पोलीस दलात जबाबदारी सांभाळली होती. विजय रमण हे २००३ मध्ये श्रीनगर येथे सीमा सुरक्षा दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून तैनात होते. त्यांनी दहा तासांच्या आव्हानात्मक चकमकीचे नेतृत्व केले होते. यामध्ये संसद हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि दहशतवादी गाझीबाबा हा चकमकीत मारला गेला होता. चंबळ खोऱ्यात दहशत माजविणाऱ्या पानसिंह तोमर याला पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले होते.