पुणे : शिवसेनेचे (शिंदे गट) मराठवाड्यातील आमदार आणि माजी मंत्र्याच्या मुलाच्या कथित अपहरणामुळे सोमवारी खळबळ उडाली. माजी मंत्र्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. चौकशीत माजी मंत्र्यांचा मुलगा खासगी विमानाने परदेशात मित्रांसोबत गेल्याचे उघड झाले. पुणे पोलिसांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्क साधला, तसेच विमानाच्या कॅप्टनशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. विमान बँकाँकला न नेता. पुन्हा पुण्याकडे वळविण्याची सूचना पोलिसांनी दिली. त्यानंतर विमान विशाखापट्टणम येथील विमानतळावर उतरविण्यात आले. माजी आमदारांचा मुलगा सुखरुप असल्याचे समजल्यानंतर कथित अपहरण नाट्यावर पडदा पडला. रात्री उशीरा खासगी विमान लोहगाव विमानतळा उतरल्यानंतर तपास यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला.
माजी मंत्र्याचा मुलगा कात्रज येथील कार्यालयातून सायंकाळी पाचच्या सुमारास एका मोटारीतून दोन मित्रांसमवेत लोहगाव विमानतळावर गेला. त्यांना तेथे सोडून परतल्यावर चालकाने याबाबतची माहिती माजी मंत्र्यांना दिली. तो कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता परदेशात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री आणि त्याचे कुटुंबीय धास्तावले. त्यांनी त्वरित ही माहिती पुणे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी केली.विमानतळासह सर्व महत्वाच्या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. पोलिसांच्या पथकाने वाहनांची तपासणीही सुरू केली.
लोहगाव विमानतळावरून उड्डाण झालेल्या विमानांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या याद्या तपासण्यात आल्या. विमानतळ आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. चौकशीत माजी मंत्र्यांचा मुलगा दोन मित्रांसमवेत परदेशात गेला असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. याबाबत सर्व विमान कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
दरम्यान, माजी आमदार सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. मुलगा पुण्याबाहेर किंवा परदेशात जाणार असल्याची कल्पना आमच्या कुटुंबियांना नव्हती. तो आकस्मिक कोठे गेले, याबाबत चिंता वाटल्याने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली, असे माजी मंत्र्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
माजी मंत्र्याच्या मुलाचे अपहरण झाल्याचा दूरध्वनी सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला आला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याहून तो खासगी विमानाने (चार्टड प्लेन) गेला असून, त्याला परत आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विमान उतरल्यानंतर याबाबतची अधिक माहिती उपलब्ध होईल.
रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त
नेमके घडले काय ?
माजी मंत्र्यांचा मुलगा आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांनी सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास खासगी विमानातून बँकाँककडे उड्डाण केले. त्यानंतर मुलाने विमानासह मित्रांची माहिती कुटुंबीयांना समाज माध्यमातून संदेशाव्दारे दिली. पुणे पोलिसांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्क साधला. विमानाचा कॅप्टनशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. विमान बँकॉकला न नेता. पुन्हा पुण्याकडे वळविण्याची सूचना पोलिसांनी दिली. त्यानंतर विमान विशाखापट्टणम येथील विमानतळावर उतरविण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली. तेथील विमानतळावर विमान उतरविण्यात आले.