पुणे: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बहुतांश मतदार संघातील उमेदवार जाहीर झाले आहेत.पण यामध्ये कोथरूड विधानसभा मतदार संघ हा सुरुवातीपासून चर्चेत राहिला असून या मतदार संघातून भाजपने चंद्रकांत पाटील आणि मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली.पण दुसर्‍या बाजूला ठाकरे गटाकडून आठ दिवसापासून केवळ चर्चा होत्या.आम्ही लवकरच उमेदवार जाहीर करू असे नेत्यांकडून सांगितले गेले.या बैठका दरम्यान या मतदार संघातून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे,पुणे महापालिकेतील ठाकरे गटाचे गटनेते पृथ्वीराज सुतार या दोघांच्या नावाची चर्चा सुरू होती.यामुळे या दोघांपैकी कोणा एकाला उद्धव ठाकरे संधी देतात,याकडे सर्वांचे लक्ष होते.

त्याच दरम्यान आज दुपारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोथरूड विधानसभा मतदार संघातून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी घोषित केली.चंद्रकांत मोकाटे यांच्या उमेदवारीमुळे कोथरूड विधानसभा मतदार संघात चंद्रकांत मोकाटे,चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे अशी तिरंगी लढत होणार आहे.तर पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे याच मतदार संघात वास्तव्यास आहेत.त्यामुळे ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची मानली जात असून या मतदार संघाकडे सर्वच राजकीय मंडळींच लक्ष असणार आहे.

Story img Loader