पुणे : काँग्रेसचा ‘हात’ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेस आणि शिवसेनेने (ठाकरे) लक्ष्य केले आहे. वक्फ बोर्डाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेची शक्यता असल्यानेच ते सत्तेच्या जवळ गेले आहेत, अशी टीका शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून करण्यात आली, तर भीती आणि आमिषापोटीच धंगेकर शिवसेनेत गेल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भात गैरव्यवहार झाला असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, असे सांगतानाच धंगेकर यांनी या व्यवहारात भाजपचा एक पदाधिकारी भागीदार असल्याचा दावा केला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात धंगेकर यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली होती. त्यानंतर अडीच वर्षांनी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यातच धंगेकर आणि काँग्रेसमधील ‘अंतर’ वाढल्याने ते काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा सातत्याने सुरू होती. धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याने या चर्चेला बळ मिळाले होते. त्यानुसार धंगेकर यांचा सोमवारी शिवसेनेत (शिंदे) पक्ष प्रवेश झाला.

या पक्ष प्रवेशाचे पडसादही उमटण्यास सुरुवात झाली. वक्फ बोर्डाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात त्यांना किंवा त्यांच्या पत्नीला अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठीच त्यांनी सत्तेतील पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली. त्यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही धंगेकर यांंच्यावर आरोप केले.

‘काँग्रेसने धंगेकर यांना चार वेळा निवडणुकीची संधी दिली. काँग्रेसने त्यांना काहीच कमी केले नाही. पोटनिवडणुकीनंतर धंगेकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध होता. मात्र, त्यानंतरही पक्ष म्हणून त्यांचे काम केले. मी निवडणूक लढविली तेव्हा धंगेकर यांनी मला मदत केली नव्हती. निष्ठांवत कार्यकर्त्यांना डावलून त्यांना उमेदवारी देण्यात आली. कार्यकर्त्यांनीही त्यांचे प्रामाणिकपणे काम केले. धंगेकर आमदार झाल्यानंतर पक्षाची ध्येय-धोरणे, विचारसरणी त्यांनी कधीच स्वीकारली नाही. काँग्रेसने माझ्यासाठी काम करावे, मी काँग्रेससाठी करणार नाही, अशीच त्यांची भूमिका होती. पक्षाच्या कोणत्याही आंदोलन किंवा बैठकीला ते उपस्थित रहात नव्हते. पक्ष बदलण्याचा त्यांचा इतिहास आहे. त्यांच्याविरोधात वरिष्ठ नेत्यांकडेही तक्रार करण्यात आली होती. धंगेकर यांनी मतलबी राजकारण केले आहे. निविदेमध्ये अडचणी येत असल्याने आणि वक्फ बोर्डाच्या जागेचा वाद निर्माण झाल्याने त्यांनी सत्तेत असलेल्या पक्षात प्रवेश केला. अटकेची कारवाई टाळण्यासाठीच त्यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे,’ अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली.

महायुतीमधील संघर्षाचा दुसरा अंक

धंगेकर भाजपप्रणित महायुतीमध्ये सहभागी झाले असले तरी, धंगेकर आणि भाजपचे स्थानिक आमदार तसेच पदाधिकाऱ्यांमधील संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. महायुतीमधील कसब्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच धंगेकर यांना विधानपरिषद दिली जाईल, अशीही चर्चा आहे.

‘भाजपमधील सर्वच लोक वाईट आहेत, असे नाही. मात्र, सगळेच चांगले आहेत, असेही नाही,’ असे सांगत धंगेकर यांनी संघर्ष कायम राहणार असल्याचे संकेत दिले.

वक्फ बोर्डाच्या जागेसंदर्भात गैरव्यवहार झाला असेल तर, माझ्यावर गुन्हा दाखल करावा. या प्रकरणी भाजपचा एक पदाधिकारी माझा भागीदार आहे. – रवींद्र धंगेकर, माजी आमदार

Story img Loader