पुणे : काँग्रेसचे भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत येत्या मंगळवारी (२२ एप्रिल) थोपटे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. काँग्रेसने सातत्याने डावलल्याने आणि अपेक्षित ताकद न दिल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे थोपटे यांनी रविवारी जाहीर केले.
काँग्रेसकडून सलग तीन वेळा निवडून आलेले माजी आमदार संग्राम थोपटे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सातत्याने काही दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार पक्ष सोडण्याची वेळ का आली, याची यादी वाचतानाच थोपटे यांनी रविवारी त्यांच्या भाजपप्रवेशाबाबतची माहिती दिली.‘काँग्रेसनेच ही वेळ आणली आहे. मला कधीही संधी मिळाली नाही. विरोधी पक्षनेतेपदाची अपेक्षा होती, तीही पूर्ण करण्यात आली नाही. कार्याध्यक्षपदही देण्यात आले नाही. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती संधीही नाकारण्यात आली. राजकीय दृष्टिकोनातून पक्षाने कधीही ताकद दिली नाही. भाजपमध्ये न्याय मिळेल, असे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना वाटत आहे,’ असे थोपटे यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘सलग तीन वेळा निवडून आल्यानंतरही मला अपेक्षित ताकद मिळाली नाही. पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता मला ताकद दिली असती, तर विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसले असते. ही नाराजी एकदम आलेली नाही. २०१९ पासून नाराजीला सुरुवात झाली होती. मात्र, भाजपमध्ये कोणत्याही पदासाठी जात नसून मला कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.’
‘तीन वेळा आमदार असताना मतदारसंघात अनेक विकासकामे केली. या कामांना गती द्यायची असेल, तर दुसऱ्या पक्षात जावे लागेल, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे हा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. विकासकामांना गती देण्यासाठी भाजप हाच योग्य पर्याय आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी माझी पुढील भूमिका स्पष्ट करणार होतो. त्यानुसार ही भूमिका घेतली आहे. येत्या मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश होईल,’ असेही थोपटे यांनी सांगितले.