भोसरी विधानसभेत राजकीय घडामोडींना वेग

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाला राम- राम ठोकला आहे. उद्या बुधवारी शरद पवार यांच्या मोदी बाग येथील निवासस्थानी अजित गव्हाणे हे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील त्यांच्यासह शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एक मेसेज सोशल मीडियावर वायरल होत आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : अजित पवारांना मोठा धक्का! शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष यांचा राजीनामा

भोसरी विधानसभेमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ते मानले जाणारे अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत अजित पवार गटाला धक्का दिला आहे. शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असताना माजी आमदार विलास लांडे हे देखील अजित गव्हाणे यांच्या सोबत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. शरद पवार गटातून त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे माजी आमदार विलास लांडे देखील निवडणूक लढण्यासाठी चाचणी करत असल्याचे बोललं जात आहे. अजित पवार गटाच्या शहराध्य अजित गव्हाणे यांनी राजीनामा दिल्याने शरद पवार यांनी अजित पवारांना शह दिल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूका लक्षात घेऊन अनेक जण शरद पवार गटात उडी मारू शकतात. दुसरीकडे, अजित पवारांच्या संमतीने हे प्रवेश होत असल्याची चर्चा देखील शहरात आहे.