पुणे: शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे सुरुवात झाली आहे.या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार,खासदार सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत.मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हे हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू होती.त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात भावी खासदार आशयाचे फ्लेक्स लावले होते.त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
त्याच दरम्यान आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिरुर लोकसभा मतदार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या बैठकीला विद्यमान खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे,आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते.याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
हेही वाचा >>>पिंपरी: निगडीत मनोरुग्ण तरुणीवर अत्याचार; आरोपी अटकेत
या बैठकीनंतर शिरुर लोकसभा मतदार संघातून इच्छुक उमेदवार असलेले माजी आमदार विलास लांडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,शिरुर लोकसभा मतदार संघातील आढावा शरद पवार यांनी जाणून घेतला.त्यावेळी अमोल कोल्हे यांना पुन्हा शिरुरमधून निवडणूक लढवावी लागेल असे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.