पुणे : राज्यशास्त्राचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, लेखक आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय प्रल्हाद देव (वय ७८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, दोन मुली, जावई आणि नातू असा परिवार आहे. ते दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे जावई आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे वडील होत. विजय देव यांच्या अंतिम इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यशास्त्राचे अभ्यासक, लेखक म्हणून डॉ. देव परिचित होते. त्यांनी स. प. महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे ३५ वर्षे अध्यापन केले. दोन वर्षे प्राचार्यपद भूषवून ते निवृत्त झाले. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, दुर्गसंपदा अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केले. गोनीदांच्या विविध साहित्यकृतींच्या अभिवाचनाची संस्कृती त्यांनी रूजविली. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. या मंडळातर्फे दरवर्षी दुर्ग साहित्य संमेलनासह दुर्ग जागरणाचे विविध उपक्रम त्यांनी राबविले. मृण्मयी प्रकाशन संस्थेचे ते संचालक होते.

राज्यशास्त्र अभ्यास मंडळ, विद्वत सभा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे ते सदस्य होते. विजय देव यांनी आयुष्यभर सरस्वतीची सेवा केली. सरस्वतीच्या ओंजळीतील फूल गळून पडले आहे. विद्येची संपत्ती दान करणाऱ्या देव यांना विद्यार्थ्यांचे प्रेम मिळाले. त्यांचे हसतमुख असे दर्शन आता घडणार नाही, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी देव यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former principal author dr vijay dev passes away in pune