राज्यात परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकुळ घातला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यालाला तर सोमवारी रात्री मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढलं. शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. झाडे, फांद्या आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रात्री घराबाहेर असलेले अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले. या पार्श्वभूमीवर काल(मंगळवार) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपावर जोरदार टीका केली. शिवाय शहाराच्या दुरावस्थेबाबत मनपाला जाबही विचारला होता.
PHOTOS : आभाळ फाटलं!, पुणेकरांनी अनुभवला उरात धडकी भरवणारा पाऊस
अजित पवार म्हणाले, “स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील.” असं अजित पवार म्हणाले होते.
PHOTOS : पुण्यात परतीच्या पावसाचं थैमान; श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातही शिरले पाणी
यावर आता पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांना ट्वीटद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे. “आदरणीय दादा, बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?, आंबिल ओढा दुर्घटनेतील बळींना जबाबदार कोण?, PMPML का खिळखिळी झाली?, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला?, मेट्रो दहा वर्षें कागदावर कोणी ठेवली?, कचऱ्याची समस्या का झाली?, BRT बळींचं पाप कोणाचं? या प्रश्नांची उत्तरे पुणेकरांकडे आहे.!” असं मोहोळ यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
तर, “तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करतो. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत.” असंही अजित पवार यांनी काल म्हटलं होतं.
याशिवाय “पुण्यात बिल्डर किंवा महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांशी लागेबांधे असणाऱ्यांनी निसर्गाने पुर्वीच्या काळात तयार केलेले नैसर्गित स्त्रोत जसे की नद्या, ओढे, नाले इत्यादी ठिकाणी मोठ्याप्रमाणावर राडारोडा टाकून, बुजवून इमारती उभारल्या आहेत. मागे पुण्यातही हेच घडल्यानंतर त्यावेळी पालकमंत्री या नात्याने मी बैठक घेतली होती. त्यावेळी भाजपाचीच महापालिकेत सत्ता होती. मी त्यावेळी महापौर, आयुक्त आणि सगळ्या टीमला सांगतिलं होतं, की याच्यात राजकारण आणू नका. परंतु पुण्याच्या आजुबाजुला टेकड्यांचा डोंगराचा भाग आहे. तिथून ज्यावेळेस मोठ्याप्रमाणावर पाणी जोरात खाली येतं. ते पाणी ओढ्या, नाल्यांनी नदीपर्यंत मिळण्यासाठीचा जो मार्ग आहे, त्या मार्गावरील अतिक्रमणं ताबडतोब काढली पाहिजेत. त्यामध्ये कोणी बांधकाम केलेलं असेल तर ते तोडलं पाहिजे. काही ठिकाणी काहींनी मोठे नाले बुजवले आणि पाईप टाकले आहेत. त्या पाईपांचा आकार लहान असल्याने त्यामध्ये तेवढ्या प्रमाणावरील पाणी बसत नाही. मग पाणी मागे दाबलं जातं आणि ते नागरिकांच्या वसाहतीत शिरतं आणि त्यांचं नुकसान होतं.” असंही अजित पवारांनी काल पत्रकारपरिषदेत सांगितलं होतं.