पुणे : पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (पुणे) म्हाडा अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून हे पद रिक्त होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती केल्याने आढळराव यांचा शिरूर हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्य शासनाचे उपसचिव अजित कवडे यांनी याबाबतचे आदेश प्रसृत केले. या पदाचा कार्यभार यापूर्वी कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे आणि एकत्रित राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी सांभाळला आहे. हे पद २०२० पासून रिक्त होते. प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे, प्रादेशिक मंडळाच्या दोन प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे, प्रधानमंत्री आवास योजना आदी कामे म्हाडाच्या माध्यमातून त्यांना कामे करता येणार आहे. घाटगे यांनी हे पद एक ते दीड वर्ष सांभाळले होते. त्यांच्यापूर्वीही काही वर्षे हे पद रिक्त होते. पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी हे पद भूषविले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून आढळराव यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. आढळराव यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार आहे.
हेही वाचा >>>निलेश राणे हल्ला प्रकरण : भ्याड हल्ले करून कोणीच कुणाला थांबवू शकत नाही, योग्य कारवाई करू – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आढळराव हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून प्रबळ दावेदार मानले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. हे एकप्रकारे आढळराव यांचे पुनर्वसन मानण्यात येत आहे. त्यामुळे शिरूर मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपकडे जाण्याची दाट शक्यता या निर्णयामुळे निर्माण झाली आहे.