चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळण्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीने ठरवले असेल तर मी पुन्हा जनतेसमोर जाण्यास तयार असल्याचे राहुल कलाटे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना म्हटले.
२०१९ च्या चिंचवड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत बंड करून राहुल कलाटे अपक्ष लढले होते. त्यांना विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल कलाटे पुरस्कृत उमेदवार ठरू शकतात. अशी स्थानिक राजकारणात चर्चा सुरू आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी राहुल कलाटे यांचा पराभव केला होता.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी निवडणूक लढण्याची चर्चा आहे. निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. असे असताना आता महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे माजी बंडखोर नेते राहुल कलाटे हे लढणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – पुणे : कोथरूडमध्ये हप्ता न दिल्याने दुकानदारावर चाकूने हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल
२०१४ आणि २०१९ ची चिंचवड विधानसभा कलाटे लढले होते. त्यांना दांडगा अनुभव असून ते २०१९ च्या निवडणुकीत दोन नंबरवर, सर्वात जास्त मते घेणारे उमेदवार होते. आता पुन्हा त्यांनी अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. महाविकास आघाडीने ठरवले तर मी पुन्हा जनतेसमोर जाईल, असे विधान राहुल कलाटे यांनी केले आहे. महाविकास आघाडी यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.