पुणे : नववर्षाचे स्वागत करताना तरुणाईकडून गडाचे पावित्र्यभंग होऊ नये या उद्देशातून राज्यातील गडकिल्ले आणि संरक्षित स्मारकांचे पावित्र्य रक्षणासाठी कार्यरत राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे वन विभागाच्या सहभागातून मंगळवारी दिवसभर सिंहगडाच्या पायथ्याशी गडरक्षण मोहीम राबविण्यात आली. वन विभागातर्फे उपनगरातील टेकड्या आणि जिल्ह्यातील अभयारण्यांमध्ये दिवसभर आणि रात्रीही गस्त वाढविण्यात आली होती.
वनविभाग वनव्यवस्थापन समिती घेरा सिंहगडचे कर्मचारी आणि राजे शिवराय प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकत्यांनी सकाळपासूनच घाटरस्त्याने गडावर जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केलीहोती. मद्य, मांसाहारी पदार्थ, धुम्रपानाचे साहित्य घेऊन गडावर जाणाऱ्या पर्यटकांना या वेळी रोखण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे गेल्या वीस वर्षांपासून गड स्वच्छता अभियान आणि गड रक्षणासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. याशिवाय दरवर्षी नवीन वर्षाच्या एक दिवसआधी, पूर्वसंध्येला सिंहगडावर कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य होऊ नये यासाठी आम्ही वन विभागाच्या सहभागातून वाहनांची तपासणी मोहीम राबवितो. या वर्षीही हा उपक्रम राबविण्यात आला. तपासणी दरम्यान, पर्यटकांकडून देशी-विदेशी मद्य, तंबाखू, विडी, सिगारेट अशा धुम्रपानाच्या साहित्याबरोबरच धोकादायक चीनी बनावटीचा मांजा देखील जप्त करण्यात आला. गडावर जाणाऱ्या पर्यटकांना गडाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व आम्ही पटवून दिले, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांनी दिली.
हेही वाचा >>>Dattatray Bharne : “कोणी काहीही म्हणू द्या, पण पुण्याचे पालकमंत्री फक्त…”, मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं भाष्य
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल गोणते, प्रशांत हरेकर, निलेश पारीख, मयुर लोयरे, हर्षल तापकीर, शुभम चांदेरे, सुनील गवारे यांसह विविध कार्यकर्ते मोहिमेत सहभागी झाले होते. वनविभागाचे वनपाल समाधान पाटील , वनरक्षक बळीराम वायकर, कोमल सपकाळ, सुनिता कुचगावे, मैथिली गुरव, संदिप कोळी, दत्ता जोरकरयांसह इतर कार्यकर्त्यांनी दिवसभर बंदोबस्त केला. सायंकाळी सहानंतर गडावर गेलेल्या पर्यटकांना परत पाठविण्यात आले.