दिवाळीत वाडय़ा-वाडय़ांमध्ये तसेच अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये किंवा उपलब्ध छोटय़ा जागेत बालगोपाळांनी एकत्र येऊन मातीचा किल्ला तयार करण्याची प्रथा अनेक वर्षे होती. नव्या युगातही ही प्रथा सुरू असली, तरी सार्वजनिक ठिकाणी मंडळांनी किल्ले तयार करण्याचे प्रमाण पुण्यात गेल्या काही वर्षांत लक्षणीय रीत्या वाढले आहे. यंदाही प्रमुख चौकांमधून असे किल्ले दिसत असून हे भव्य किल्ले पाहण्यासाठी गर्दीही होत आहे.
दिवाळीची सुटी लागली की वाडय़ांच्या अंगणामध्ये किल्ला तयार करण्याची प्रथा शहरात अनेक वर्षे होती. जुन्या पुण्यातील वाडय़ांची जागा अपार्टमेंटनी घेतली तरीही अपार्टमेंटमध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल त्या जागेत बालगोपाळ एकत्र येऊन किल्ला तयार करतात. अशावेळी वाहने बाहेर ठेवून बालगोपाळांना पार्किंगमध्येही किल्ला करण्याची परवानगी मोठय़ांकडून दिली जाते. किल्ले तयार करण्याच्या या अनेक वर्षे सुरू असलेल्या प्रथेला पुण्यात गेल्या काही वर्षांत भव्य किल्ल्यांची जोड मिळाली आहे.
पुणे शहर तसेच उपनगरांमधील अनेक सार्वजनिक मंडळे या उपक्रमात पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे. शहरात तसेच उपनगरातील प्रमुख चौकांमध्ये किल्ल्यांच्या प्रतिकृती करण्याची नवी प्रथा आता शहरात पडली आहे. सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते दिवाळीपूर्वी दोन-चार दिवस आधी किल्ल्यासाठी लागणारे साहित्य मोठय़ा प्रमाणावर खरेदी करतात आणि रात्री प्रत्यक्ष किल्ला तयार करण्याचे काम केले जाते. बहुतेक किल्ले हे चौकांमध्ये किंवा रस्त्यांच्या कडेने असलेल्या मोकळ्या जागांमध्ये केले जात असल्यामुळे हे किल्ले पाहण्यासाठी प्रेक्षकही मोठय़ा संख्येने येतात. महाराष्ट्रातील अनेक गडकोटांच्या प्रतिकृती या निमित्ताने पुणेकरांना पाहायला मिळत आहेत. अनेक मंडळे सागरी किल्ल्यांच्याही देखण्या प्रतिकृती तयार करतात, तर काही मंडळांकडून भुईकोट किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. या किल्ल्यांवर सायंकाळी सुंदर प्रकाशयोजनाही केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा