पुणे : ‘देश आणि धर्मापेक्षा मानवतेला प्राधान्य देणाऱ्या हमीद दलवाई यांनी स्थापन केलेली मुस्लिम सत्यशोधक चळवळ ही केवळ प्रादेशिक किंवा राष्ट्रीय नव्हे तर ती जागतिक संदर्भातही महत्त्वाची ठरते. ‘मी सर्वप्रथम माणूस, नंतर भारतीय आणि शेवटी मुस्लिम आहे’ असे म्हणणाऱ्या दलवाई यांच्या कार्याची नोंद प्रार्थना समाजाच्या अहवालातही घेण्यात आली आहे. धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि आधुनिकता वाढवण्यासाठी त्यांनी जमातवादाविरूध्द लढा पुकारला. त्यांनी उपस्थित केलेले मुस्लिम महिलांचे प्रश्न हा लढा मानवमुक्तीचा होता,’ असे मत विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता अभ्यास शिबिरात बीजभाषण दीक्षित बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक पत्रिका वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. आदित्य साने दिग्दर्शित ‘व्हेन द केज बर्ड सिंग्ज’ हा माहितीपट दाखविण्यात आला. शिबिराच्या विविध सत्रांमध्ये राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे, न्या. जी. बी. पारेख आणि मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अन्वर शेख, महाराष्ट्र गांधी विश्वस्त निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी मार्गदर्शन केले. मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शमसुद्दीन तांबोळी अध्यक्षस्थानी होते. हिंदू- मुस्लिम यांच्यातील विश्वास आणि सलोखा वाढवण्यासाठी मंडळ काम करणार असल्याचे तांबोळी यांनी सांगितले. समान नागरी कायदा अस्तित्वात यावा, म्हणून मंडळाच्या वतीने सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘एका जमातवादाला संपवण्यासाठी प्रतिस्पर्धी जमातवाद पर्यायी ठरु शकत नाही. तर, त्यातून दोन्ही जमातवाद एकमेकावर पोसले जाऊन गलेलठ्ठ होतात,’ अशा शब्दांत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जमातवादाचा धोका अधोरेखित केला होता. अशा प्रकारचा जमातवाद सध्या आपण आज अनुभवत आहोत. सध्याच्या खालावलेल्या परिस्थितीवर व्यक्त होण्याची इच्छा होत नाही.डाॅ. राजा दीक्षित, माजी अध्यक्ष, विश्वकोश निर्मीती मंडळ

हैदरावादमध्ये ‘दुनियादारी’

हैदराबाद येथे ‘दुनियादारी’ ही मुस्लिम सामाजिक चळवळ उभी राहिली आहे. लेखक-कवी आणि कार्यकर्ते शेख युसुफ बाबा उर्फ स्कायबाबा या चळवळीचे समन्वयक आहेत. मुस्लिम समाजामध्ये प्रबोधनाचे हे कार्य करीत असताना मुस्लिम जमातवादी कसा विरोध करतात याची अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली. पुरुष प्रधानता, धर्मांधता आणि कालबाह्य परंपरेस समाज कसा बळी पडतो याचे अनुभव सांगून त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या धर्तीवर काम उभे करण्याचा मनोदय व्यक्त केला.