देशातील सर्कस उद्योगाला ऊर्जितावस्था यावी यासाठी झटणारे आणि पुण्यातील रॅम्बो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सून, विवाहित मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. हडपसर येथील सेपल्कर दफनभूमीत शनिवारी दिलीप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा- बारामती- मोरगाव रस्त्यावर अपघातात तिघांचा मृत्यू
पी. टी. दिलीप हे मूळचे केरळचे. रत्नागिरी येथे शिक्षण झालेल्या दिलीप यांनी नव्वदच्या दशकात तीन लहान सर्कस एकत्र केल्या. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांनी स्थापन केलेल्या रॅम्बो सर्कसने संपूर्ण आशियाचा दौरा केला. सर्कसच्या माध्यमातून पुण्याचे नाव जगप्रसिद्ध केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेतर्फे १९९२ मध्ये पी. टी. दिलीप यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सर्कसमध्ये प्राण्यांच्या खेळांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे उताराला लागलेल्या सर्कसला ऊर्जितावस्था यावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले.
सर्कसला मध्यवर्ती ठिकाणी कमी दरात मैदान मिळावे, यासाठी प्रत्येक शहरामध्ये त्यांनी खूप प्रयत्न केले. राज्य सरकारने सर्कस उद्योगाला आर्थिक पाठबळ द्यावे, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. गेली दोन वर्षे करोनाच्या संकटात सर्कसला राज्य सरकारकडून मदत मिळावी, म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न करून मदत मिळवून दिली होती.