साडेचार कोटींच्या पुस्तकविक्रीने आजवरच्या इतिहासातील उच्चांक
पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करीत नियोजित संमेलनाध्यक्षांनी केलेल्या टीकेमुळे पिंपरी-चिंचवड येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर संक्रांत आली असली, तरी या संमेलनातील ग्रंथप्रदर्शनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ग्रंथविक्रेते आणि प्रकाशकांची संक्रांत गोड झाली. संमेलनातील ग्रंथनगरीमध्ये वाचकांचा आणि पुस्तकांची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या साहित्यप्रेमींचा राबता सतत होता. तब्बल साडेचार कोटी रुपयांच्या पुस्तकविक्रीने साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासातील उच्चांक प्रस्थापित केला आहे.
पिंपरी-चिंचवड येथे प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड उत्सुकता होती. एकाच ठिकाणी वाङ्यमाची विविध दालने खुली करणाऱ्या या संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनामध्ये तब्बल चारशे गाळे होते. संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शन समितीमध्ये मराठी प्रकाशक परिषदेचे सभासद असलेले प्रकाशक आणि ग्रंथविक्रेता असे दोन प्रतिनिधी समाविष्ट केल्यामुळे गाळ्यांचे वितरण करताना कोणाचीही तक्रार आली नाही. बालभारती, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, राज्य साहित्य संस्कृती मंडळ, शासकीय फोटोझिंको मुद्रणालय, विवेकानंद केंद्र, इतिहासाचार्य राजवाडे इतिहास संशोधक मंडळ, ऊर्दू साहित्य विक्रीची दोन दालने होती. ध्वनिफिती, सीडी, व्हीसीडी आणि ऑडिओ बुक या माध्यमातून विक्री करणारे २० गाळे होते. गेल्या वर्षी पंजाबमधील घुमान येथे साहित्य संमेलन झाले होते. तेथे मराठी माणसांची संख्या मोठय़ा प्रमाणावर नसल्याने ग्रंथविक्री होणार नाही अशी अटकळ बांधून प्रकाशक या संमेलनामध्ये सहभागी झाले नव्हते. मात्र, यंदाचे संमेलन पुणे परिसरात झाल्याने दोन वर्षांची कसर भरून निघाली.
ग्रंथप्रदर्शनामध्ये पुस्तक विक्रीसाठी प्रकाशकांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या होत्या. प्रसिद्ध लेखकांची आकर्षक छायाचित्रे, त्यांचे विचार असलेली पोस्टर्स, ऑडिओ आणि व्हिडीओ ध्वनिमुद्रणाद्वारे वाचकांना ग्रंथदालनाकडे आकर्षित करून घेण्यात आले होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. सदानंद मोरे, अच्युत गोडबोले, श्रीनिवास ठाणेदार, प्रवीण दवणे अशा लेखकांनी ग्रंथदालनामध्ये बसून विक्री झालेल्या स्वत:च्या पुस्तकांवर वाचकांना स्वाक्षरी दिली. त्यामुळे दालनामध्ये युवा वर्गाच्या वाचकांनीही गर्दी केली होती. एका पुस्तकावर दुसरे मोफत, संपूर्ण संच खरेदी केल्यास ५० टक्के सवलत आणि लकी ड्रॉ असे वेगवेगळे प्रकारही प्रकाशकांनी हाताळले.
पिंपरी-चिंचवड येथील हे साहित्य संमेलन चार दिवसांचे असले तरी ग्रंथिदडीमुळे शुक्रवार आणि उद्घाटन कार्यक्रमामुळे शनिवार दुपापर्यंत असा दीड दिवसांचा कालावधी गेला. त्यामुळे उर्वरित अडीच दिवसांमध्येच बहुतांश विक्री झाली असून ती वैयक्तिक स्वरूपाची आहे. शाळा आिण महाविद्यालयातील ग्रंथालयांची खरेदी झाली असती तर हा आकडा पाच कोटींपेक्षाही पुढे गेला असता. हिंदूस्थान अँटिबायोटिक्सच्या मैदानावरील परिसरात साकारलेल्या ग्रंथनगरीमध्ये भरपूर अंतर सोडले असल्यामुळे ग्रंथप्रदर्शनामध्ये गर्दी झाली तरी नंतर येणाऱ्या वाचकांची गर्दीदेखील त्यामध्ये सामावू शकली. नियमित वाचक, संमेलनात ग्रंथखरेदीसाठी तरतूद करणारे वाचक, नोकरदार महिला आणि युवक-युवती यांना पुस्तके हाताळण्यास भरपूर वेळ मिळाला आणि मनाप्रमाणे खरेदीही करता आली, असा सर्वच प्रकाशकांचा अनुभव आहे. नागपुरातून आलेल्या साहित्य प्रसार केंद्राचा ९० हजार रुपयांचा, लाखे प्रकाशनचा ६५ हजार रुपयांचा व्यवसाय झाला. विजय प्रकाशनच्या १ लाख रुपयांच्या तर ऋचा प्रकाशनच्या २५ हजार रुपयांच्या पुस्तकांची
विक्री झाली.
‘कटय़ार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ या नाटकांच्या पुस्तकांना, ‘हिंदू’, ‘कोसला’, ‘बिढार’ या पुस्तकांना मागणी होती. संस्थेची सुमारे चार लाखांची पुस्तक विक्री झाली. – अस्मिता मोहिते, पॉप्युलर प्रकाशन

सर्वाधिक मागणीची पुस्तके
राऊ (ना. सं. इनामदार)
मृत्युंजय
कोसला
मुसाफिर
छावा
हिंदू
मनात
मी असा घडलो
युगंधर
नटसम्राट
एकटा जीव
लोक माझा सांगाती
धूळपाटी
जिनियस

Story img Loader