पोलीस असल्याची बतावणी करुन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतयाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून फसवणुकीचे चार गुन्हे उघड झाले आहेत.प्रमोद बाळू ढेरे (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे. कल्याणीनगर भागात ढेरे याने पोलीस असल्याची बतावणी करुन नागरिकांची फसवणूक केली होती. गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून तपास करण्यात येत होता. ढेरे मोटारीतून येरवडा भागात वावरत होता. त्याच्या मोटारीवर महाराष्ट्र पोलिसांचे बोधचिन्ह होते. पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला.
हेही वाचा >>>पुणे : ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक फाैजदार महेंद्र पवार, नागेशसिंग कुँवर, रमेश राठोड, मनोज सांगळे आदींनी ही कारवाई केली. आरोपी प्रमोद ढेरे बारावी उत्तीर्ण आहे. तो बेरोजगार आहे. तो काही तरी काम काढून पोलीस ठाण्यात नेहमी जायचा. पोलीस ठाण्यातील कार्यपद्धती तसेच पोलिसांचे राहणीमान, वेशभूषेची त्याला माहिती होती. ढेरेने पोलीस असल्याची बतावणी करुन कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर भागात पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.