चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून चंदन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
सद्दाम बेसमिल्हादू लोद (वय ३४, रा. जंजाळा, ता. सिल्लोड, जि. ओैरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वडगाव शेरी भागातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. चोरटा चंदननगर भागातील नदीपात्रात थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. लोद याच्याबरोबर असलेले दोन साथीदार पसार झाले.
हेही वाचा >>> ’आयआरसीटीसी’च्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून ज्येष्ठाला साडेतीन लाखांना गंडा
लोद याच्याकडून चंदनाच्या झाडाची दोन बुंधे जप्त करण्यात आले. वडगाव शेरीतील डिमेलो सर्व्हिस परिसरातून लोदने चंदनाचे झाड कापून नेल्याचे उघडकीस आले आहे. लोदने वानवडी, चतु:शृंगी, येरवडा, चंदननगर पोलीस ठाण्याच्या परिसरात चंदन चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस उपायुक्त शशीकांत बोराटे, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गु्न्हे शाखेचे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक निरीक्षक निलेश घोरपडे, अरविंद कुमरे, सचिन रणदिवे, सुहास निगडे आदींनी ही कारवाई केली.