एनडीए चौकातील (चांदणी चौक) अतिरिक्त दोन मार्गिकांची कामे चालू आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वाहतुककोंडी टाळण्यासाठी आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील) उड्डाणपूलाचे काम सुरू करण्याचा निर्णय महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) घेतला आहे. परिणामी या पूलाच्या कामाला आणखी चार दिवस विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (७ ऑक्टोबर) महापालिका, पीएमआरडीए आणि वाहतूक पोलीस यांची एकत्रित बैठक होणार आहे.
विद्यापीठ चौकात उड्डाणपूलाचे काम सुरू करण्याचे सर्व नियोजन पीएमआरडीएकडून पूर्ण करण्यात आले आहे. चांदणी चौकात पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले असून अतिरिक्त दोन मार्गिकांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, ते पूर्ण होण्यास अद्याप काही दिवस लागणार आहे. याच कालवधीत विद्यापीठ चौकात पूलाचे काम सुरू केल्यास दोन्ही ठिकाणी वाहतूकीची कोंडी होऊन नागरिकांना त्रास होऊ शकतो. या सर्व गोष्टींचा विचार केला, तर काम सुरू केल्यानंतर नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे ६ ऑक्टोबरऐवजी हे काम १० ऑक्टोबरपासून सुरू करावे, अशी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सूचना केली आहे. तसे केल्यास एनडीए चौकातील अतिरिक्त दोन मार्गिकांचे काम पूर्ण होऊन तेथील वाहतूक सुरळीत होईल आणि विद्यापीठ चौकावरही ताण कमी होईल, अशी माहिती पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा