पुणे : बारामतीतील खांडज गाव परिसरात गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली. या घटनेत एकजण बचावला असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्याच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रकाश सोपान आटोळे, प्रवीण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे, बापूराव लहुजी गव्हाणे, अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. खांडज गाव परिसरातील आटोळे वस्तीत बुधवारी (१५ मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. आटोळे, गव्हाणे आणि आणखी एकजण गोबर गॅसच्या टाकीत पडले. गोबर गॅसच्या टाकीत पाचजण पडल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा – पुणे : वाहतूक नियमनाऐवजी दंड वसुली करणारा वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबित
पाचजणांना बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच आटोळे, गव्हाणे यांचा मृत्यू झाला. या घटनेत एकजण बचावला असून त्याला बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली होती.