पुणे : पुणे महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने दोन महिलांसह चौघांची साडेसतरा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी संतोष शांतीलाल वाल्हेकर (रा. ताडीवाला रस्ता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभांगी भिकाराम पोटे (वय ३६, रा. वाघोली) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वाल्हेकर याच्याशी पोटे यांची ओळख झाली होती. वाल्हेकरने पोटे, त्यांची भावजय सईंद्रा वाजे तसेच परिचित रोहन जाधव आणि आकाश गायकवाड यांना पुणे महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. वाल्हेकर याने त्यांच्याकडून साडेसतरा लाख रुपये घेतले होते. पैसे घेतल्यानंतर वाल्हेकरकडे त्यांनी नोकरीबाबात विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोटे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करत आहेत.