लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत शेतातील विहिरीचे काम करताना कठडा आणि मुरुम कोसळल्याने चार मजूर गाडले गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. विहिरीत गाडल्या गेलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) काम सुरू केले आहे.

सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी (वय ३०), परशुराम चव्हाण (वय ३०), मनोज मारुती चव्हाण (वय ४०) अशी मजुरांची नावे आहेत. सणसर परिसरातील म्हसोबावाडीत विजय क्षीरसागर यांची शेतजमीन आहे. मंगळवारी रात्री शेतातील विहिरीचे काम करताना अचानक कठडा ढासळला. मुरुमाखाली चार मजूर गाडले गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली.

आणखी वाचा-पुणे: येरवड्यातील खुल्या कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, सहायक निरीक्षक दिलीप पवार आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील मुरुमाखाली गाडले गेलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी पोकलेन, जेसीबी यंत्र मागविण्यात आले.

त्यानंतर या घटनेची माहिती एनडीआरएफच्या पथकाला कळविण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी विहिरीत गाडले गेलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी काम सुरू केले असून, विहिरीत गाडले गेलेले चार मजूर इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four laborers were buried when a rock collapsed while working on well in indapur pune print news rbk 25 mrj
Show comments