पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांकडून छुप्या पद्धतीने मोबाइल संच वापरण्यात येत असल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून स्मार्ट कार्ड मोबाईल योजना सुरू करण्यात आली. ही योजना सुरू झाल्यानंतरही येरवडा कारागृहाच्या आवारात चार मोबाइल संच सापडल्याने कारागृहातील सुरक्षाव्यवस्था कुचकामी असल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत कारागृह अधिकारी वीरु खळबुटे (वय ३७) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहातील माडी गेट आणि अंतर्गत भिंतीत चार मोबाइल संच लपवून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. येरवडा कारागृहाच्या पाठीमागील बाजूस प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर कारागृह कर्मचारी वसाहत आहे. तेथून काही अंतरावर कारागृहाचे मुद्रणालय आहे. कारागृहाच्या आवारात मंगळवारी रक्षक गस्त घालत होते. त्या वेळी मुद्रणालयाच्या परिसरातील उंच सीमाभिंतीतील एका कप्यात चार मोबाइल संच आढळून आले. तीन मोबाइल संचात सीमकार्ड आढळून आले आहे. या प्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत असून, कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.