कराड : पुणे- बंगळूरू महामार्गावरील कराड शेजारील ढेबेवाडी फाटा येथे मोटारगाडी चालक आणि पोलिसांमध्ये मोटारगाडी थोडी मागे घे म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीवेळी पोलिसाला मारहाण झाल्याची घटना भरदुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करताना, तिघांना अटकही केली आहे. पोलीस हवालदार ब्रह्मानंद माने यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोटारगाडी चालक व त्याच्या पत्नीसह अन्य दोघांवर पोलिसाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करताना, तीन जणांना अटकही करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम अरूण भोसले (रा. कोल्हापूर), तनवीर नझरूद्दीन मुल्ला (४०), जावेद महमंद इनामदार (३४, दोघेही रा. म्हासोली, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. यातील शुभम भोसलेने पोलीस व्हॅन रस्ता ओलांडत असताना आपली मोटारगाडी पोलीस व्हॅनच्या आडवी मारून रस्त्यावरच थांबवली. पोलिसांनी गाडीतून खाली उतरून त्यास ‘गाडी थोडी मागे घे’ असे सांगितले. यावर शुभमने गाडीतून खाली उतरून ‘तु पुढे कसा जातोस बघतोच’, असे म्हणत फिर्यादी पोलीस हवालदार ब्रह्मानंद माने यांच्या कानाखाली मारली. माने पुन्हा गाडीत बसत असताना शुभमची पत्नी व तनीवर मुल्ला व जावेद इनामदारने ब्रह्मानंद माने यांचा हात धरून त्यांना गाडीतून खाली खेचून त्यांचा हात पिरगळून खाली पाडले. शुभम व त्याच्या पत्नीने माने यांच्या डोक्यात, कानावर, हातावर मारहाण करून त्यांना जखमी करून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद माने यांनी दिली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे अधिक तपास करीत आहेत.
अक्षम्य दुर्लक्षामुळे गंभीर प्रसंग

दरम्यान, या खळबळजनक घटनेने मोटारगाडी चालकांची नियम मोडण्याची वृत्ती, मनमानी, दादागिरीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस, वाहतूक पोलीस व रस्तेविकासाशी संबंधित यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशा गंभीर प्रसंगांना अनेकदा सर्वसामान्यांना सामोरे जावे लागते. तरी याची दखल घेवून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.