पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) नोकरी लावणे, तसेच विद्युत कामाचा ठेका मिळवून देण्याच्या आमिषाने चाैघांची २८ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पाेलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसाद गोविंद वझे (रा. लक्ष्मी पार्क सोसायटी, कोंढवे धावडे), परमेश्वर अंकुश शिंदे (रा. ब्रम्हा हाॅटेलसमोर, सिंहगड रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत विजय साखरे (वय ४२, रा. भूमकर चौक, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साखरे इलेक्ट्रिकल अभियंता आहेत. अरोपी शिंदे याचा प्रवासी वाहतुकीसाठी गाड्या पुरविण्याचा व्यवसाय आहे. साखरे यांची आरोपी शिंदे याच्याशी ओळख झाली होती. शिंदेने साखरे यांची वझेशी ओळख करून दिली होती. आरोपी वझे याची एनडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी त्याने साखरे यांच्याकडे केली होती.

हेही वाचा – “महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभव दिसतोय म्हणूनच…”; भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची टीका

वझे एनडीएत कायमस्वरुपी लिपिक पदावर नोकरी लावून देतील, तसेच ओळखीतून विद्युत विषयक कामाचा ठेका मिळवून देतील, असे आमिष आरोपी शिंदेने त्यांना दाखविले होते. साखरे यांच्या पत्नीला एनडीएत नाेकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपी शिंदेने त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर शिंदेने साखरेंची वझेशी भेट घालून दिली. कायमस्वरुपी नोकरी लावून देण्यासाठी साखरेकडे आठ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. साखरे मूळगावी गेले. तेथे नातेवाईकांची भेट घेतली. नोकरी लावण्यासाठी पैसे लागणार असल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले. तेव्हा नातेवाईकांनी मुलाला नोकरी लावण्यास सांगितले. पैशांची जुळवाजुळव करून साखरे पुण्यात परतले. शिंदेमार्फत त्यांनी वझेची भेट घेतली.

हेही वाचा – ‘कसब्या’त कडक बंदोबस्त; निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांची मनाई; समाजमाध्यमावर लक्ष

साखरे आणि त्यांच्या तीन नातेवाईकांनी वझे आणि शिंदेला ऑनलाइन, तसेच रोखीने एकूण २८ लाख रुपये दिले. त्यानंतर त्यांना नोकरी लावून दिली नाही, तसेच विद्युतविषयक कामाचा ठेकाही मिळवून दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखरे यांनी शिंदे याच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वझे याच्याशी संपर्क साधला. तेव्हा वझे याचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four people cheated of 28 lakhs fall in lure of job in nda pune print news rbk 25 ssb