लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. येरवडा, कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्ग, पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या. येरवडा भागात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दत्ता शंकर शेळके (वय २९, रा. राजीव गांधीनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत शेळके यांची बहीण जनाबाई सुंदरसिंग बायस (वय ४२, रा. रांजणी, ता. घणसांगवी, जि. जालना) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दत्ता हे २७ जानेवारी रोजी पहाटे येरवड्यातील डॉन बॉस्को शाळेसमोरुन निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दत्ता यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघाताानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक विभुते तपास करत आहेत.
कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर भरधाव मोटारीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हेमंत अरविंद शिंदे (रा. प्राजक्ता बिल्डींग, पापडे वस्ती, फुरसुंगी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक अमोल एकनाथ काळे (वय ३६, रा. सिल्व्हर पार्क, ऊरळी देवाची, सासवड रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हेमंत शिंदे यांचा भाऊ सागर (वय ४५) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हेमंत शिंदे हे कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. त्या वेळी मधुबन हॉटेलसमोर भरधाव मोटारने हेमंत यांना धडक दिली. मोटारीने हेमंत यांना फरफटत नेले. त्यानंतर मोटार रस्त्याच्या कडेला आदळल्याने मोटारचालक अमोल काळे जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तरुणाला भरधाव दुचाकीने धडक दिली. अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सैफन मेहताब शेख (रा. पुनावळे, पिंपरी-चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार अनिश तिवारी (रा. वैदुवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत हजरत मेहताब शेख (वय ३७, रा. पुनावळे, पिंपरी-चिंचवड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका परिसरात टँकर दुभाजकावर आदळून टँकरचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुजीत सुरजीत सिंग असे मृत्युमुखी पडलेल्या टँकरचालकाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी दिगंबर जगताप यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कवडीपाटा टोलनाक परिसरात रविवारी पहाटे पाचच्या सुमारास भरधाव टँकर दुभाजकावर आदळला. अपघातात टँकरचालक गुरुजीत सिंग गंभीर जखमी झाला. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी तपास करत आहेत.