लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : रांजणगाव परिसरातील सराइताकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने देशी बनावटीच्या चार पिस्तुलांसह १२ काडतुसे, तीन मॅगझिन असा शस्त्रसाठा जप्त केला.
सूरज राजेश पाडळे (वय २७, रा. सोनसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पाडळे आणि त्याचा साथीदार संकेत संतोष महामुनी (रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी मध्य प्रदेशातून देशी बनावटीची चार पिस्तुले, काडतुसे खरेदी केली होती. महामुनी आणि त्याच्याबरोबर असलेल्या तीन साथीदारांनी पिस्तुले पाडळे याच्याकडे ठेवायला दिली होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन सोनसांगवी गावातून पाडळेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार पिस्तुले, १२ काडतुसे, तीन मॅगझीन अशा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
पाडळे आणि महामुनी हे सराइत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या तीन महिन्यात ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने सराइतांकडून सात पिस्तुले आणि १७ काडतुसे जप्त केली आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, तुषार पंदारे, जनार्दन शेळकरे, संजय जाधव, राजू मोमीन, अमोल शेडगे यांनी ही कारवाई केली.