पिंपरी- चिंचवड शहरातून चार पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवडच्या खंडणीविरोधी पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. खंडणी विरोधी पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत, सोबत एक छऱ्याची गनदेखील ताब्यात घेतली आहे. तर अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. रोहित संतोष जाधव, आदित्य बापू शिंदे आणि विशाल शहाजी कसबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी यांना रोहित संतोष जाधव आणि आदित्य बापू शिंदे हे पिंपळे निलख परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. दोघांना सापळा लावून ताब्यात घेतलं, त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून सोबत एक छऱ्याची गनदेखील मिळाली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या टीमने केली आहे. तर अंमली पदार्थ विरोधी पथकाने गस्त घालत असताना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी विशाल शहाजी कसबे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार थांबल्याचं दिसलं. त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस सापडले आहे. विशाल कसबे याच्यावर एकूण गंभीर १६ गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, दंगली असे गुन्हे दाखल असून तडीपारची कारवाई सुद्धा झालेली आहे. ही कामगिरी पोलीस कर्मचारी संदीप पाटील आणि अशोक गारगोटे यांनी केली आहे.