जागतिक मानसिक आरोग्य दिनाला येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात नरकयातना भोगत असलेल्या रुग्णांना आशेचा किरण दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुग्णालयातील भयंकर परिस्थितीला ‘लोकसत्ता’ने वाचा फोडल्यानंतर अखेर शासनाचे डोळे उघडले आहेत. आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान उद्या, गुरुवारी रुग्णालयाला भेट देणार असल्याचे समजते. या भेटीच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनानेही खडबडून जागे होऊन बुधवारी रुग्णालयाची पाहणी केली.
आरोग्य संचालक सतीश पवार यांनी बुधवारी रुग्णालयाला भेट दिली. स्वच्छतागृहांत पाणी उपलब्ध नसणे, सांडपाण्याच्या विल्हेवाटीची व्यवस्थाच सडलेली असणे, रुग्णालयात पराकोटीची अस्वच्छता असणे, मनोरुग्णांना अत्यंत खराब दर्जाचे कपडे पुरवले जाणे, दलालांना खूश केल्याशिवाय रुग्णालयात प्रवेश न मिळणे अशा आजवर पडद्यात असलेल्या समस्या अधिकाऱ्यांच्या दिवसभर झालेल्या बैठकांमध्ये गाजल्याचे कळते.
येरवडा मनोरुग्णालय सुमारे ११० एकरांत पसरलेले असून ते आशिया खंडातील सर्वात मोठे मनोरुग्णालय आहे. रुग्णालयातील सांडपाणी व्यवस्था शंभर वर्षे जुनी असून ती पूर्णत: खराब झाली आहे. ही व्यवस्था बदलण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांच्या बैठकीत समोर आला. आता हा निधी मिळवणे आणि त्याचा योग्य कारणासाठी उपयोग होणे हे प्रशासनासमोरील आव्हान असणार आहे. रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे पगाराअभावी सतत होणारे संप आणि मुळातच या कामगारांची संख्या अत्यल्प असल्यामुळे स्वच्छतेचे वाजलेले तीनतेरा याचीही चर्चा प्रशासकीय बैठकांत झाली. स्वच्छतेचे काम घेतलेल्या कंत्राटदाराला कामावरून दूर करण्यात आले आहे. रुग्णांचे कपडे निकृष्ट दर्जाचे असल्याची बाबही प्रशासनाच्या निदर्शनास आल्याचे समजते.
रुग्णालयातील असुविधांबद्दल विविध पातळ्यांवरून वारंवार तक्रारी होऊनही रुग्णालय प्रशासन त्याकडे कायम दुर्लक्षच करत असल्याबद्दल ‘लोकसत्ता’ने मालिका प्रसिद्ध केली होती. रुग्णालयातील तुंबलेली स्वच्छतागृहे, अस्वच्छ परिसर आणि त्यामुळे सुटलेली असह्य़ दुर्गंधी अशा वातावरणातच मनोरुग्णांना दिवस कंठावे लागत आहेत. निकृष्ट कापडाचे सहज फाटणारे कपडे आणि ते धुण्यासाठी सोयच नसणे यामुळे रुग्णांना त्वचारोगांचाही सामना करावा लागत आहे. कपडे धुण्यासाठीच्या व्यवस्थेचा पत्ताच नसल्यामुळे चक्करुग्णांकडूनच कपडे धुवून घेतले जात आहेत. रुग्णालयात प्रवेश घेण्यासाठीची न्यायालयीन प्रक्रिया पायदळी तुडवून दलालांमार्फत रुग्णांना प्रवेश दिला जात आहे. हा प्रवेश देण्यासाठी अतिरिक्त पैसेही उकळले जात आहेत.
येरवडा मनोरुग्णालयाबाबत अखेर डोळे उघडले!
जागतिक मानसिक आरोग्य दिनाला येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात नरकयातना भोगत असलेल्या रुग्णांना आशेचा किरण दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुग्णालयातील भयंकर परिस्थितीला ‘लोकसत्ता’ने वाचा फोडल्यानंतर अखेर शासनाचे डोळे उघडले आहेत.
आणखी वाचा
First published on: 10-10-2013 at 02:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fouzia khan will visit to yerwada mental hospital